...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!
क्रांतिकारी सातारा जिल्ह्यात पत्रकारितेत जेष्ठ पत्रकार म्हणून आजही माण तालुक्यातील बिजवडी गावचे बापूराव लक्ष्मण गुंजवटे दादा यांचे नाव घेतले जाते.त्यांनी आपल्या परखड व निर्भिड लेखणीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता करत असताना आज दि.15 जानेवारी रोजी त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्त....
माण तालुका पत्रकार संघाचे संस्थापक, जेष्ठ पत्रकार बापूराव लक्ष्मण गुंजवटे (दादा ) यांनी बिजवडी ता.माण डेटलाईनवरून सन १९८१ सालापासून दैनिक शिवसंदेश,दै.ग्रामोध्दार, दै.कर्मयोगी,दै.सह्याद्री एक्सप्रेस ,दै.तरूणभारत, दै.ऐक्य,दै.पुण्यनगरी ,दै.लोकमत आदी दैनिकात तसेच विविध साप्ताहिकात अविरतपणे सामाजिक ,राजकीय,शैक्षणिक,क्रिडा क्षेत्रात निर्भिडपणे लिखाण केले आहे.सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच चूकीच्या पध्दतीने वागणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे कामही त्यांनी केले आहे.कोणाचीही लाचारी न पत्करता स्वाभिमानाने निर्भिड लिखाण केल्याबद्दल तसेच पत्रकारितेतले भीष्माचार्य म्हणून उपाधी देत विविध दैनिके साप्ताहिके,संस्था,मंडळे ,माणदेश फौंडेशन पुणे, फलटण ग्रामीण पत्रकार संघ ,माण तालुका पत्रकार संघ आदींनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.आपल्या परखड लेखणीतून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत असतानाच अनेकांना पत्रकारिता शिकवून या प्रवाहात आणण्याचे काम ही त्यांनी केले आहे.सर्व पत्रकारांना एकत्र करत सहकाऱ्यांच्या मदतीने माण तालुका पत्रकार संघाची स्थापना करून सर्वांना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न केलेत.
पूर्वी तालुक्यात दोन ते तीनच पत्रकार होते.समाजाचे प्रश्न मांडत असताना त्यावेळी ना मोबाईल, ना गाडी होती.त्यामुळे बातमी मिळवण्यासाठी गावोगावी एसटीने जावे लागत होते.प्रसंगी अनेकदा पायी पत्रकारिता करावी लागत होती. बातमीसाठी वणवण करून ती लिहून पोस्टाने साताराला पाठवायची.दोनतीन दिवसांनी ती बातमी कार्यालयात पोहचल्यावर ती लागायची. त्यानंतर एसटी ने बातम्यांची पाकिटे पाठवली जात होती. नंतर फँक्स, मेल आले.अन आता दुसऱ्या मिनिटात बातमी कार्यालयात पोहचतेय.अशा बातम्यांच्या बदलत्या प्रवाहात टिकून सातत्याने बातम्या देण्याचे काम गुंजवटे दादांनी केले आहे.आजही त्यांच्या कार्याचा व जेष्ठतेचा गौरव होत आहे.अनेकांना समाजात मानप्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच राजकीय प्रवाहात ही अनेकांना विविध पदावर संधी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे.विविध प्रश्न लेखणीच्या माध्यमातून मांडत असताना कोणालाही त्यांनी त्रास दिला नाही.त्यामुळे आजही त्यांनी जनतेच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यांच्या कार्याबद्दल बोलावे तेवढे कमी आहे.आज त्यांचा 79 वा वाढदिवस त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत त्यांनी शंभरी पार करावी याच आमच्या मनापासून सदिच्छा.....!
Comments
Post a Comment