माण पंचायत समितीच्या सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर तर उपसभापतींचा अविश्वास ठराव नामंजूर !




 बिजवडी - माण पंचायत समितीच्या सभापती सौ.कविता जगदाळे यांच्याविरोधात ८ विरूध्द २ ने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.मात्र उपसभापती पदाच्या अविश्वास ठराव प्रक्रियेत राजकीय घडामोडी घडल्याने उपसभापती तानाजी कट्टे यांच्याविरोधातला अविश्वास ठराव २ विरूध्द ८ ने नामंजूर झाला.

  माण पंचायत समितीच्या सभापती सौ.कविता जगदाळे व उपसभापती तानाजी कट्टे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात , विकासकामात अडथळा निर्माण करतात ,अरेरावीची भाषा वापरतात ही कारणे देत उर्वरित ८ सदस्यांनी जिल्हाधिकारी सो यांचेकडे सभापती ,उपसभापती यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला होता.

  माण पंचायत समितीच्या सभागृहात आज दि.१२ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पीठासीन अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत अविश्वास ठराव प्रक्रिया पार पडली. त्यांना गटविकास अधिकारी एस.बी. पाटील यांनी सहकार्य केले. 

 गटविकास अधिकारी एस.बी.पाटील यांनी प्रस्तावाचे वाचन केल्यानंतर सभापती सौ.कविता जगदाळे यांच्याविरोधात अविश्वास ठरावासाठी मतदान घेण्यात आले.यात उपसभापती तानाजी कट्टे ,सदस्य रमेश पाटोळे ,नितीन राजगे ,तानाजी काटकर ,सौ.अपर्णा भोसले ,सौ.लतिका विरकर ,सौ.रंजना जगदाळे ,सौ.चंद्राबाई आटपाडकर या सर्वपक्षिय ८ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले.तर सभापती सौ.कविता जगदाळे यांचेकडे त्यांचे एक व सदस्य विजयकुमार मगर यांचे एक अशी दोनच मते राहिली.त्यामुळे सभापती वरती ८-२ ने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

तर उपसभापती तानाजी कट्टे यांच्यावर ज्या सदस्यांनी अविश्वास ठराव प्रस्ताव सादर केला होता त्यातील एक सदस्य सोडून सर्व सदस्यांनी ठराव नामंजूर करण्यासाठी त्यांच्या बाजूने हात वर केले.त्यामुळे उपसभापतीचा अविश्वास ठराव २ विरूध्द ८ ने नामंजूर झाला.

यावेळी अविश्वास ठराव दिलेल्या त्या ८ सदस्यांमधून विजयकुमार मगर यांनी माघार घेत सभापती सौ.कविता जगदाळे यांचेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.

 यावेळी सभापती सौ.कविता जगदाळे यांनी पीठासीन अधिकाऱ्यांकडे ठरावावर ज्यांची सही नाही त्यांच मत याठिकाणी ग्राह्य धरले जाणार का ही शंका उपस्थित केली.यावर सदस्य म्हणून त्यांना मत देण्याचा अधिकार असल्याचे पीठासीन अधिकारी यांनी सांगितले.

दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि आर.पी.भुजबळ यांनी पंचायत समितीत चोख बंदोबस्त ठेवला होता.


सत्तेच्या लालसेपोटी विरोधकांची अभद्र युती...! 

विरोधकांनी पोलीसांना हाताशी धरून मला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी माझ्यासह कार्यकर्त्यांवर पानवण प्रकणात खोट्या केसेस दाखल केल्या. आम्हाला न्यायालयीन प्रक्रियेत अडकवत त्याचदरम्यान माण पंचायत समितीत आम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा डाव टाकण्यात आला.पंचायत समितीच्या निवडणूकीत जनतेने दिलेला कौल.. याविरोधात जावून विरोधक नेतेमंडळींनी व खुर्चीसाठी हपापलेल्या सदस्यांनी जनतेचा विश्वासघात करत सत्तेच्या लालसेपोटी अभद्र युती केली.आमच्या सभापतीवरती अविश्वास ठराव जिंकून मोठा विजय मिळविला या भ्रमात अभद्र युतीतील त्या सदस्यांसह त्यांच्या नेतेमंडळींनी राहू नये.क्यों की पिक्चर अभी बाकी है..येणाऱ्या काळात त्यांच्या या अभद्र वागणूकीबद्दल जनताच त्यांना धडा शिकवेल.
- शेखरभाऊ गोरे ,युवानेते शिवसेना माण खटाव

हुश्शार उपसभापती...

माण पंचायत समितीत सर्वपक्षिय ८ सदस्यांनी सभापतीसह उपसभापती यांच्यावरतीही अविश्वास ठराव प्रस्ताव दाखल केला होता.मात्र हुशार उपसभापती तानाजी कट्टे यांनी आपल्यावरही अविश्वास ठराव प्रस्ताव आलाय म्हटल्यावर तेच सर्वपक्षियांच्या ताफ्यात जावून सामील झाले.त्यामुळे ७ सदस्यांनी उपसभापतीवर केलेल्या टीका टिप्पणी , कारणांना बगल देत त्यांच्या बाजूने हात वर करत मतदान केले. त्यामुळे तानाजी कट्टेंचे उपसभापती पद अबाधित राहिले.यामुळे मात्र उपसभापतीपदासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवत या सर्वपक्षिय ताफ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता त्यांचे काय होणार हा प्रश्नच राहून गेला.त्यामुळे या सर्वपक्षिय वादळात आपली खुर्ची शाबूत ठेवणारे उपसभापती तानाजी कट्टेंना हुश्शारच म्हणावे लागणार .


पत्रकार - विशाल गुंजवटे ९४२११२१०९०

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!