माण पंचायत समितीत रंगलंय सर्वपक्षिय राजकारण...! शेखर गोरे समर्थक विरोधात आमदार जयकुमार गोरे ,महादेवराव जानकर , प्रभाकर देशमुख ,अनिल देसाई समर्थक एकत्र


बापूराव गुंजवटे :

बिजवडी - माण पंचायत समितीत पदाधिकाऱ्यांचा पंचवार्षिक कालावधी काही महिन्यावर येऊन ठेपल्याने उर्वरित दिवसासाठी तरी आपलेही नाव बोर्डावर यावे यासाठी काही पंचायत समिती सदस्यांच्या सुप्त इच्छा प्रकट झाल्या .त्या पूर्ण करण्यासाठी सर्वपक्षिय सदस्य सुरूवातीला नेतेमंडळींच्या परस्पर तर नंतर नेतेमंडळींची मनधरणी करून त्यांच्या परवानगीने पंचायत समितीत सत्तेचा सारीपाट मांडला. यासाठी माण पंचायत समितीतला शिवसेना नेते शेखर गोरे यांच्या धनुष्यबाणाचा वेध रोखण्यासाठी भाजपचे आमदार जयकुमार गोरे ,राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख ,जि.बँकेचे संचालक अनिल देसाई ,रासपचे मामूशेठ विरकर , बबनदादा विरकर यांचे समर्थक सदस्य एकत्र झाले.सभापती विरोधात ८ - २ ने अविश्वास ठराव जिंकत या सारीपाटाचा प्रारंभही त्यांनी यशस्वीपणे केलाय खरा पण या सत्तेच्या सारीपाटात कोणाकोणाला संधी मिळतेय हे पाहावे लागेल.माण तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले असले तरी सत्ता व खुर्ची काय असते अन ती कशी मिळवायची हे माण पंचायत समितीत रंगलेल्या राजकारणावरून दिसून आले.
  शेखर गोरे राष्ट्रवादीत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली माण पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच ,त्यावेळचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे गटाचे तीन , रासपचा एक ,तर अनिल देसाई गटाचा एक असे एकूण दहा सदस्य निवडून आले होते.यावेळी राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करत सभापतीपदी रमेश पाटोळे तर उपसभापती नितीन राजगे यांची निवड केली.
 विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार जयकुमार गोरे यांनी कॉग्रेसमधून भाजपमध्ये तर शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला.  त्यादरम्यान रमेश पाटोळे व नितीन राजगे यांचा सभापती व उपसभापतीचा कार्यकाल संपला. पुढील अडीच वर्षांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या.शेखर गोरे यांनी सत्ता ताब्यात ठेवत सभापती पदी सौ.कविता जगदाळे यांना संधी देत शिवसेनेचा भगवा पंचायत समितीवर फडकवला.तर उपसभापती पदाच्या निवडीत प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तानाजी कट्टे यांनी बाजी मारली होती.पंचवार्षिक कालावधी संपत आल्याने काही सदस्यांच्या सभापती व उपसभापतिपदाच्या सुप्त इच्छा प्रकट झाल्या.त्यामुळे त्यांनी सर्वपक्षिय एकत्र येत या ना त्या कारणाने सौ.कविता जगदाळे व तानाजी कट्टे यांना धारेवर धरत त्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत सभापती व उपसभापती वर अविश्वास ठराव दाखल केला.
सौ.कविता जगदाळे महिला सभापती असल्याने त्यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी ८ सदस्यांची गरज होती.त्यामुळे त्यांच्याविरोधात रमेश पाटोळे ,नितीन राजगे ,विजयकुमार मगर ,तानाजी काटकर ,सौ.लतिका विरकर ,सौ.अपर्णा भोसले ,सौ.रंजना जगदाळे ,सौ.चंद्राबाई आटपाडकर या आठ सर्वपक्षिय सदस्यांनी सभापतीसह उपसभापती तानाजी कट्टे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर राजकीय खेळ्या झाल्याने सदस्य विजयकुमार मगर सभापती कविता जगदाळेंच्या बरोबर राहिले.

चौकट - ज्या सर्वपक्षिय सदस्यांनी तानाजी कट्टे यांच्यावरती अविश्वास ठराव दाखल केला होता ते तानाजी कट्टे तक्रारदारांनाच जावून मिळाल्याने सदस्यांनी त्यांचे उपसभापती पद शाबूत ठेवले.यावेळी फक्त सभापतीपदावरच अविश्वास आल्याने पंचायत समितीतले शिवसेनेला सभापतीपद गमवावे लागले.

चौकट - माण तालुक्यात पंचायत समितीत रंगलेले हे राजकीय नाट्य मात्र सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेले.सत्तेसाठी काहीपण या उक्तीप्रमाणे एका च्या विरोधात सर्वपक्षिय सदस्य आल्याचे दिसून आले.आता हे सर्वपक्षिय सदस्य सत्तेच वाटप कसे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.कारण उपसभापती पद मिळेल म्हणून काहींनी यात सहभाग घेतला होता.तानाजी कट्टेंचे उपसभापती कायम राहिल्याने इच्छुकांचा निश्चितच हिरमोड झाला असेल.राहिला विषय सभापती पदाचा.अविश्वास ठराव आल्यानंतर किमान महिनाभर तरी नवीन पदाची निवडणूक लागणार नाही.या पदासाठी सध्यातरी रासपच्या सौ.लतिका विरकर यांचे नाव पुढे आहे. या कोरोनाच्या महामारीत काही दिवस असेच गेले तर इतर सदस्यांच्या पदरी काय पडणार हाही संशोधनाचा विषय आहे.

चौकट - अनिल देसाई समर्थक तानाजी काटकर यांचे एक मत महत्वाचे असल्याने ते पहिल्यापासूनच सर्वांच्या आश्वासनाचे बळी ठरलेत.आताही त्यांच्याबाबत तीच परिस्थिती दिसून येते.
यात आमदार गोरे गटानेही विरोधकांनाशी हातमिळवणी केलीय खरी पण त्यांच्याही  पदरी काही पडणार का हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एकंदरीत या पंचायत समितीच्या महानाट्याने तालुक्यातील राजकारण कोणत्या थराला जावू शकते हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच समजले असेल.ज्यांच्याविरोधात निवडणूका लढवल्या ,जिंकल्या त्यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तेच होणार वाटप जनतेला पचनी पडणार का..? हे ही येणाऱ्या काळात पाहावे लागेल. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!