डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी दहिवडीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..!- नगरसेविका सौ.अर्चना खरात
बिजवडी - राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे.रक्ताच्या अपुऱ्या पुरवठ्या मुळे रुग्णाच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे. 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हीच गरज लक्षात घेऊन क्रांतिसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि. १४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन दहिवडी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केल्याची माहिती दहिवडी नगरपंचायत च्या नगरसेविका सौ अर्चना विजय खरात यांनी दिली.
दहिवडीत प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. मात्र दुसऱ्यावर्षी सुद्धा कोरोना महामारीच्या संकटा मुळे शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन अत्यंत साध्या पद्धतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना रुग्ण वाढत असताना आपल्या माण खटाव मधील कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची मदत व्हावी म्हणून मायणी येथील कोव्हिड सेंटरला या रक्ताचा पुरवठा केला जाणार आहे. रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेले चार दिवस रक्तदात्यांची पूर्वनोंदणी करणे सुरू आहे. 'रक्तदान हेच जीवनदान' समजून शेकडोहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरासाठी नोंदणी केली आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपण सर्वांनी सहभागी व्हावे व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून रक्तदान शिबिरात सामील व्हावे असे आवाहन सौ अर्चना खरात यांनी सर्वांना केले आहे.
Comments
Post a Comment