पायी वारी हा वारकऱ्यांचा अधिकार...!-ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले ; शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा
बिजवडी - पंढरपूरच्या पोटनिवडणूकीसाठी राज्यकर्त्यांना सभा ,मेळावे,मतदानास परवानगी मिळते.त्यावेळी कोरोना दिसत नाही अन वारीच्या वेळेस पायी वारीला परवानगी नाकारली जाते का तर त्यावेळी कोरोना दिसतो.शासनाच्या या दुटप्पी धोरणाचे विशेष वाटते. वारकऱ्यांना पायी वारी करण्याचा अधिकार आहे.त्यामुळे शासनाने वारकरी संप्रदायाच्या पायी वारीच्या आग्रही मागणीचा विचार करून निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी वारकरी युवा संप्रदायचे राज्याचे अध्यक्ष ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
कोरोनाचे वाढते प्रमाण , कडक लॉकडाऊन तरीही पंढरपूर सारख्या ठिकाणी हजारोंचे उपस्थितीत राजकीय मेळावे होऊ शकत होते.मंत्री मंडळ तथा विरोध पक्षाचे सर्व नेते पंढरपूरात रात्रंदिवस ठाण मांडून बसले होते. त्यावेळी कोरोना फिरायला बाहेर गेला होता का..? अन आता माऊलींची वारी आली आहे त्यामुळे तो माघारी येईल असे शासनाला वाटतेय.शासनाच्या या सापत्नपणाच्या वागणूकीचा व माऊलींच्या पायीवारी संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाचा वारकरी सांप्रदायातर्फे निषेध करण्यात येत आहे.
कोरोना काळात वारकरी सर्व नियमांचे पालन करायला तयार असताना तसेच ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे त्याच लोकांना परवानगी दिली तरी चालेल.
एखाद्या ठिकाणी मंत्री ,व्हीआयपी लोक येतात त्यावेळी सुरक्षा पुरवली जाते अन वारीच्या वेळी सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे केले जाते.वारकरी शिस्तिचे पालन करणारे आहे . शासनाने कठोर निर्बंध घालावे मात्र सोहळा पायी होऊ द्यावा ही आमची आग्रही मागणी आहे.त्याबाबत अगदी संख्या ही शासनाने ठरवावी याबाबत आमचे दुमत नाही.यावर लक्ष ठेवण्यासाठी ज्या अधिकारी वर्गाला वारकरी वर्गाविषयी माहिती आहे असे अधिकारी त्या समितीवर नेमावेत. ज्यांचा वारकऱ्यांचा व संप्रदायाशी काही संबंध नाही ते काय अहवाल सादर करणार आहेत.प्रशासनाला पूर्णतः सहकार्य करण्याची भूमिका संपूर्ण वारकरी संप्रदायाची आहे.भले संख्या अजून काही कमी करा मात्र सोहळा हा पायीच झाला पाहिजे यावर संपूर्ण वारकरी संप्रदायाचे एकमत आहे .
वारकरी संप्रदाय आत्यंतिक काळजीपूर्वक शासकीय निर्बंध पाळत पायी वारी करेल .शक्य तिथे प्रशानाने पोलीस दलाची देखील मदत घ्यायला हरकत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वारकऱ्यांविषयी आस्था आहे त्यांनी व शासनाने वारकरी वर्गाच्या भावनांचा गांभीर्याने विचार करुन पायी वारीसंदर्भात योग्य असा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी केली आहे.
चौकट - वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव आहे .शासनाला कोरोनाची भीती वाटत असेल तर खास पायी वारी करणाऱ्या वारकरी वर्गासाठी आर्ट ऑफ लिविंग पंढरपूर येथे सुसज्ज असे सर्व अत्याधुनिक सुविधा असणारे कोविड सेंटर निःशुल्क उभारेल व त्यांच्या उपचाराची जबाबदारी घेईल .
Comments
Post a Comment