भगवान साहेब : एक आदर्श मित्र.......!
*मोगराळे ता.माण येथील दिलदार व्यक्तीमत्व ,आमचे परममित्र भगवानराव जगदाळे (साहेब) यांना जावून एक वर्ष झाले.सामाजिक कार्यातून लोकांच्या आनंदात आपला आनंद पाहणारे व मोगराळे ग्रामस्थांचा आधारवड बनलेल्या नावातच देव असलेल्या जिवलग मित्राने मोठ्या संघर्षातून उत्तुंग भरारी घेतली. मात्र सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानक देवाने या जनतेतल्या दुसऱ्या भगवान देवाला बोलवणं पाठवून आपल्याकडे घेऊन गेले.परंतू आम्हा सर्वांना पोरक करून गेले.त्यांच्यासमवेत चाळीस वर्षाच्या मैत्रीतला अल्पसा घेतलेला आढावा*........
शब्दांकन - श्री. प्रभाकर खांडे (सर)
सदस्य ,ग्रामपंचायत वारूगड ता.माण
मोगराळे ता.माण येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या भगवान मित्राने लहानपणापासूनच प्रतिकुल परिस्थितीचा सामना केला.आपल्या कर्तृत्वाने शासनाच्या रोजगार हमी विभागात २०० रूपये पगारात नोकरी सुरु केली.जगदाळे आण्णा व साहेब म्हणून लोक त्यांना ओळखू लागले.प्रेमळवृत्ती,गरिबाविषयीं तळमळ,शिस्तबद्ध स्वभाव, कर्तव्य निष्ठ, कामावरील श्रद्धा यामुळे ते अबालवृद्धामध्ये लोकप्रिय झाले.अपुऱ्या पगारातच कुटूंब चालवताना त्यांची तारांबळ होत होती.त्या काळात त्यांना आईवडिलांचे आशीर्वाद व प्रोत्साहन लाभले.पुढे शासनाच्या कामावरून कमी झाल्याने किरकोळ उद्योग सुरु केले पण तेथेही स्थिरता मिळाली नाही.शेवटी गाव सोडून मुंबईला नशीब अजमावण्यासाठी जावे लागले.सुरूवातीला रंगाच्या कामात कंत्रादाराकडे काम सुरु केले.पण तल्लख बुद्धी, आकलन व निरीक्षण शक्ती आणि लोकसंग्रह या जोरावर छोटी कंत्राटे घ्यायला सुरवात केली.त्यामध्ये त्यांना छोट्या भावाचे सहकार्य मिळाले.व आजवर पाठ फिरवलेल्या भाग्याने ही साथ दिली.या जोडीला ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय सुरु केला व भगवान साहेबांचे भगवान शेठ झाले.त्यांना व्यवसायात स्थिरता मिळाली.कुटुंबातील कोणताही लहान मोठा निर्णय सर्वानुमते घेण्याची पद्धत यामुळे घरात सतत खेळीमेळीचे, हास्य विनोदाचे वातावरण असायचे. सगळे आलेंनंतरच सर्व जेवायला बसायचे तेही थट्टा मस्करी करीत.गंभीर विषयसुद्धा हसत सोडविण्याची कला त्यांचेकडून शिकावी.अडीअडचणीत सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती वाखणण्याजोगी होती.त्यामुळे गावातीलच नव्हे तर आसपासच्या पंचक्रोशीतील लोकांचा राबता त्यांच्या घरी सतत असायचा.रक्ताच्या नात्याबरोबरच जोडलेली असंख्य नाती आजही त्यांच्या सहवासातील आठवणीने गलबलून आलेली दिसतात.
व्यवसायात स्थिरता आणल्यानंतर आपल्या मुलांकडे तो सोपवत गावच्या सर्वांगीण विकासासाठी राहिलेले दिवस घालवायचे या हेतूने त्यांनी गावातच राहणे पसंत केले.पत्नी सौ.संगिता जगदाळे यांना सरपंच पदाची संधी मिळाल्यानंतर या पदाचा उपयोग त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी करत आपल्या कृतीतून तालुक्यातील गावांना आदर्श घालून दिला.
फलटणपासून दहिवडी पर्यंत वाहनांच्या साठी पेट्रोल डिझेल ची सोय व्हावी यासाठी मंत्रालयापर्यत पाठपुरावा करून पेट्रोल पंपाची उभारणी केली.पंपाचे सर्व कामकाज पूर्ण होऊन पेट्रोल पंपाचे उदघाटन ही ठरले होते.परंतू नियतीच्या मनात वेगळेच होते.काळाने अचानक घाला घालून ध्यानी मनी नसतानाही आमचा जीवलग मित्र आम्हांला सोडून अनंतात विलीन झाला.त्यांच्या नावाने सुरू झालेला बी.जी.पेट्रोलियम पंप सतत त्यांच्या कर्तृत्वाची शान मिरवत राहील. लोकांचा आधारवड बनून राहिलेल्या या भगवान साहेबांच्या कार्याचा प्रकाश अखंडीत तेवत राहील.जनतेसाठी रात्रंदिवस झटलेल्या भगवान साहेबांचे कार्य कायम स्मरणात राहावे यासाठी जनतेेनेही लोकसहभागातून त्यांच्या स्मरणार्थ स्वागत कमान उभारली आहे.
एक आदर्श व जिवलग मित्र आपल्याला सोडून गेलाय हे अजूनही खरं वाटत नाही.साहेबांचा सहवास ,प्रेम ,आपुलकी कायम स्मरणात राहील.आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन त्यानिमित्त त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली....
Comments
Post a Comment