माझी आई .....सुसाई @ ६६
आज तिचा ६६ वा वाढदिवस त्यानिमित्त ......
आईविना पोरकी असलेली अन वडीलांचा हात डोक्यावर नसताना मामांच्या छत्रछायेखाली वाढलेली माझी आहे सुसाई (सुशिला). लग्नाअगोदर ही अन लग्नानंतरही गरीबी तिच्या पाचवीलाच पुजलेली.मामाच्या घरी राहायच म्हणजे उपकाराचे ओझे डोक्यावर घेऊनच राहणं...बर आपल्या बरोबर भावालाही तिथच सांभाळायच अशी मोठी जबाबदारी तिच्यावर...मामा- मामी नेही आपल्या तीन मुलांसह ही पोरकी दोन मुले चांगल्या पध्दतीने सांभाळली.निदान लग्नानंतर तरी सुसाईच नशीब उघडल या आशेवर बिजवडी येथील गुंजवटे या गरीब कुटुंबात तिच लग्न लावून देण्यात आल.पण कशाच काय अजून नशीबात त्रासच लिहून ठेवला होता.मामाच्या घरात पोरकेपणाची कधी जाणीव न झालेल्या माझ्या आईला सासरी आल्यावर मात्र सासू काय असते ,नंणंद काय असते याची खरी जाणीव झाली.सासू सुनेचा त्रास सहन करत संसाराचा गाडा ती ओढत राहिली. पतीराजांना त्रास पाहवत नसला तरी आईपुढे त्यांचे काय चालत नव्हते.मात्र आपल्या घासातला घास ते आईला देत होते.दादांना पहिल्यापासूनच जेवणाबरोबर भजी खायची मोठी हौस. आजही ते सांगतात सुशीला सर्वांसमोर भजी देता येत नव्हती.मात्र त्या कागदात तशीच भजी ठेवून तो कागद ताटाखाली सोबणी म्हणून वापरायचे.अन नंतर आई त्या कागदातली भजी खायची.किती वाईट दिवस.त्यात नणंदबाईचा तोरा वेगळाच.मात्र आई आजही सांगते सासरे माझे देवमाणूस ते बिचारे एकाही शब्दाने मला कधी बोलले नाहीत.ते मला लक्ष्मी म्हणायचे.तूच एक दिवस या कुटुंबाला प्रगतीपथावर नेऊन मोठे नाव मिळवून देशील असे ते बोलायचे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना कुटूंबाची आर्थिक ओढाताण खूप असायची.पण अशाही परिस्थितीत तीने आमचा सांभाळ केला.एक दिवस ती उपाशी राहायची पण आम्हाला दोनवेळचा घास कसा मिळेल यासाठी मोलमजूरी करायची.मुलांना शाळेत वह्या ,दप्तरला पैसे नसायचे तर कधीकधी मोलमजूरी नाही मिळाली तर आठवडा बाजार कसा भरायचा त्यावेळी मोठे संकट तिच्यासमोर उभे राहायचे. दादांचे मित्र माने सर (मामा) मुंबईला असायचे.ते गावाला आले की घरी यायचे ,सर्वांची चौकशी करायचे.मुलांना खाऊसाठी पैसे देण्याबरोबरच वह्या पुस्तकांसाठीही पैसे द्यायचे.तर आठवडा बाजारासाठी किसनआण्णा (पोस्टमास्तर) अधूनमधून घरखर्चासाठी पैसे द्यायचे.तिचा भाऊ नोकरीला लागल्यावरही अधूमधून त्यांनी तिला मदत केली.या मदती त्याकाळी खूप मोठ्या होत्या.
दादांच्या मित्रांनी मैत्री जपली व उपकाराची जाणीव आईने ठेवली.आजही पडत्या काळात केलेली मदत आम्ही कोणीच विसरू शकत नाही.
सासरची जमीन बारा कि.मी.वरती टाकेवाडी हद्दीत लांड्या महादेवाच्या डोंगरावर होती.त्याठिकाणी पाण्याची सोय नव्हती पाऊसाच्या भरोशावरची शेती तीही खडकाळ डोंगरावरची.रोज चालत जाणे येणे करून शेती करायची. कालांतराने ती जमीन पडीकच राहीली.त्यामुळे दुसऱ्यांच्या जमिनी अर्धलीने (वाट्याने) घेऊन केली.सासू -सासरे यांच्या निधनानंतर नणंदाच्या लग्नानंतर चार मुलांचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी तीने आपल्या खांद्यावर घेतली.आठवड्यातील सहा दिवस मोलमजूरी करायची.आठवडाभर लागणाऱ्या चुलीच्या जळणासाठी ती शुक्रवारी सकाळी लवकर उठून आपल्या मैत्रीणी यमुना मावशी ,यसामावशी कौशल्या मावशी व सुशिला मावशी यांच्यासह फक्त चहा घेऊन जावली - मिरढेच्या डोंगरात जायची.तिथून जळणाची मोळी बांधून दहा किमि.चे अंतर पार करत डोक्यावर घेऊन ती दुपारपर्यंत घरी यायची.आल्यानंतर असेल तर जेवण करायची नाहितर चहावरच आपली भूक भागवत मग बाजारात जावून आठवड्याचा बाजार भरायची.आम्हाला आजही आठवतय शनिवारी सकाळी शाळेत जाताना ती चहाबरोबर बटर खाल्ल्याशिवाय जावून द्यायची नाही.आठवडाभर पुरेल असा रोज थोडाथोडा मेवा ही द्यायची. अधूनमधून अंडी ,सुकट ,बोंबील घरात घेऊन यायची.आईच्या हाताला भारी चव होती.तिच्या हातच तेलवांग तर झकास...
आईने मोलमजूरी करताना मोगराळे ते पिंगळी पर्यंतच्या रस्त्याचेही काम केलेय.आजही वीटभट्टी ,रस्त्याच्या कामावर आपली मुले बाजूला ठेवत काम करणाऱ्या महिलांना पाहिले की मला माझ्या आईची आठवण होते.आपल्या मुलांना झाडाखाली बसवून रस्त्यावर काम करणारी माझी आई खरच रणरागिनी म्हणावी लागेल.आजही या रस्त्यावरून जात असताना ती आम्हाला दाखवते की हे पहा मी या रस्त्याच्या कामावर येत होते.इतके कष्ट तीने आपल्या कुटुंबासाठी घेतले.ज्यावेळी काम नसायचे त्यावेळी ती शेळ्या घेऊन शेतात जायची.त्याकाळात तिला सख्ख्या बहिणीप्रमाणे चांगली वागणूक दिली ती सिंधू मावशीने (तुकाराम टेलरची बहिण).सासरवाशीन असलेली माझी आई कधी भाकर घेऊन तर कधी भाकरीविनाच शेतात कामावर यायची पण सिंधू मावशी आपल्या घरून येताना आईसाठीही भाकरी घेऊन यायची.तिने आईला चांगली साथ दिली.आई ,सिंधू मावशी व तीची धाकटी बहीण यांची चांगलीच जोडी होती.सिंधू मावशीने आईसाठी खूप काही केलेय.ते शब्दात न सांगण्यासारख आहे.सासरचा जाट सहन करत असताना सिंधू मावशीसारखी एखादी जिवलग मैत्रीण नक्कीच असावी.त्यांचे किस्से ऐकतच राहावे वाटतात.
संगिता आक्का व मनिषा या दोन मुली मोठ्या झाल्यानंतर कामात मदत होऊ लागली.तिला संगिता आक्काची खूप मदत झाली.परिस्थितीची जाणीव ठेवत मुलींची लवकर लग्न करून टाकली. आता घरात दोन व्यक्ती कमी झाल्या अन राहिलो ते मी व धाकटी बहिण राणी.तस आम्ही दोघही आईदादांचे लाडके.दोन्ही बहिणींची लग्न झाल्या नंतर त्या दोघींच्या डीलीव्हरीच्या वेळेला आईला खरी साथ दिली मैत्रीण सुमन मावशीने....(अंगणवाडीच्या बाई).
रात्र पाहिली नाही की दीवस ....पण तीने आईला खूप मदत केली.तीचीही परिस्थिती बिकटच.आर्थिक मदत नसेल केली पण धीर द्यायची ,साथ द्यायची मदत खरीच त्यापेक्षाही मोठी होती.आई गरीब परिस्थितीत संसार चालवत असताना तिला मैत्रिणींनी चांगली साथ मिळाली.मुलीचा डिलीव्हरीचा खर्च तसा माहेरचा पण त्या काळात छोटी का होईना पण थोरल्या जावयांनी केलेली मदत ती आजही विसरत नाही.
दारू पिऊन दादा घरी आल्यानंतर त्यांचा त्रास सहन करत मुलांना चांगले संस्कार देण्याचे काम तिने केले.
आईच खर भाग्य उजळलं ते २००२ साली.धाकटी बहिण राणीच लग्न झालं.अन नशीबाने दादांची दारूही सुटली.तेव्हापासून खर तिच्या आयुष्यात सुखाचे दिवस दिसू लागले.व नशीबाची दारे खुली झाली.तुम्ही घरात काही आणून देऊ नका पण पुन्हा दारू पिऊ नका अस सांगणाऱ्या माझ्या आईच्या डोळ्यात अजूनही आपल्या हिमतीवर कुटुंब सांभाळाची उमेद दिसून येत होती. दादांनीही तीचे कष्ट डोळ्याने पाहिले होते.त्या कष्टापुढे आपली दारू काहीच नाही म्हणत त्यांनी दारू सोडून दिली. सुरूवातीला थोडा त्रास झाला पण आईने त्यांना धीर दिला.त्यानंतर आज अखेर त्यांनी दारूच्या ठेंबाला हात लावला नाही.व आईचे कष्ट तिथेच थांबले. आईची मोलमजूरी बंद झाली.दादा सर्व पाहू लागले.नंतरच्या काळात तीने कष्ट केले ते आपल्या हक्काच्या शेतात.दादांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपल कुटुंब जगवल.त्यावेळेही आईने हक्काची शेती पाहत त्यांना मदतच केली.
नंतर आम्ही फळबागाकडे वळल्याने आईचे तेही कष्ट बंद झाले.फळबागातून चांगले उत्पन्न मिळू लागले.मग दहिवडीत एसटी स्टँण्डवर गाळा ,फलटणला मोक्याच्या ठिकाणी वनबीएचके फ्लँट ,बिजवडी ,जाधववाडी थोडीफार शेती व बिजवडीत अलिशान असा आईच्या स्वप्नातला पत्रकार व्हिला उभारला.आज ती पत्रकार व्हिलाची मालकीन बनून निवांत व सुखसमाधानचे जीवन जगत आहे.आज तिच्या कष्टाचे चीज झाले.तरीही आज कोणताही बडेजाव पणा नाही.आजही काटकसरीचा तिचा उपदेश कामी येतो.गरीब परिस्थितीचे चटके सहन केलेल्या दुखा:पुढे सुखाचे दिवस अगदीच तिच्यासाठीच नगण्यच म्हणावे लागतील.आता तर काय तिच्याच नात्यातील हिंदवी ही मुलीप्रमाणे सून मिळाली आहे.तीही आईची चांगली काळजी घेते.आईने सासूचा छळ सहन केल्यामुळे मात्र सूनेला सासूपेक्षा ती आईचीच माया देते.सर्व काही छान चाललेय.आत्ताच आईच्या सांगण्यावरून संगिता आक्का ,राणी व हिंदवी आम्ही सर्वांनी मिळून आमच्या दादांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा केला.या वाढदिवसाला दादांच्या सामाजिक , राजकीय , शैक्षणिक ,क्रिडा क्षेत्रातील संबंधितांना , आप्तेष्ट , मित्रांना निमंत्रण देत मोठा कार्यक्रम पार पाडला.आज आईचा ६६ वा वाढदिवस.तिचाही अमृतमहोत्सवी वाढदिवस आम्ही अशाच सर्वांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरा करणार आहोत.
अशा माझ्या सोशिक ,संस्कारशील , कष्टाळू सुसाईचा आज वाढदिवस.....तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....
शब्दांकन - विशाल गुंजवटे ,पत्रकार बिजवडी ता.माण जि.सातारा
Comments
Post a Comment