बिबी येथील शेतकऱ्यांना कृषीदूतांकडून जैवखते वापराबाबत जनजागृती..!
बिजवडी : वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे मातीचा पोत,पाण्याची गुणवत्ता व आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, शाश्वत शेतीच्या दृष्टीने जैवखतांचा वापर आवश्यक झाला आहे.याच उद्देशाने कृषी महाविद्यालय बारामतीत शिक्षण घेत असलेल्या कृषिदुतांच्या वतीने "जैवखते जनजागृती कार्यक्रम" आयोजित करून शेतकऱ्यांच्यात जनजागृती करण्यात आली.
बिबी ता. फलटण येथील कार्यक्रमात कृषीदूत कौस्तुभ शिपूरकर, तुषार शिर्के, आर्यन चौधरी, अनुष्क लोले, साहिल भिकले, चारुदत्त बाविस्कर, कार्तिक चौधरी व ऋषी पाठक यांनी शेतकऱ्यांना विविध जैवखतांची माहिती दिली. यामध्ये रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी (फॉस्फेट सोल्युभिलायझिंग बॅक्टेरिया), ट्रायकोडर्मा, अझोस्पिरिलम इत्यादींचा समावेश होता. जैवखते वापराचे फायदे, त्याची योग्य मात्रा, वापरण्याची पद्धत आणि त्याचे पर्यावरणीय फायदे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कृषिदुतांनी सांगितले की, “जैवखते केवळ उत्पादनवाढीस उपयुक्त नाहीत, तर ती मातीच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहेत. त्यांचा सातत्यपूर्ण वापर केल्यास रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करता येतो.
कार्यक्रमाला अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आणि माहितीपत्रके व नमुना जैवखतेही त्यांना दाखविण्यात आली.यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जैवखतांचा वापर करण्याचा निर्धार केला. या उपक्रमामुळे जैविक शेतीकडे एक सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे असे मत स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले.
फोटो - बिबी ता.फलटण येथे जैव खताबाबत जनजागृती करताना कृषीदूत...
Comments
Post a Comment