वडगाव दडसवाडा येथे दि.24 रोजी आबाबा देवाची यात्रा..!
बिजवडी - माण तालुक्यातील वडगाव (दडसवाडा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री आबाबा देवाची यात्रा उत्साहात पार पडणार आहे. कार्तिक शुद्ध तृतीयेला म्हणजेच शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी ही यात्रा संपन्न होणार असून, परिसरातील हजारो भाविक या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. समस्त ग्रामस्थ आणि श्री आबाबा देवस्थान यात्रा समिती यांच्यावतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचा शुभारंभ गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध ओवीकार मायाक्का बिरदेव ओवीकार मंडळ, लोखंडे वस्ती (पांगरी) यांच्या ओवी कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता ज्योत सतोबा देवस्थान टाकेवाडी, येथून दडसवाडा येथे नेण्यात येईल. सकाळी ७वाजता श्री आबाबा देवाची काठी भव्य मिरवणुकीसह काढण्यात येणार असून सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत भव्य गज नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. कचरेवाडी, मार्डी (वाडिखोरा), कोकरेवाडी, कन्हेर, पांगरी व टाकेवाडी येथील गजी मंडळे या पारंपरिक यात्रोत्सवात सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडेल तर सायं. ५:३० वाजता महाप्रसादाने या यात्रेचा समारोप होईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही आबाबा देवाच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, भक्तीमय वातावरणात देवदर्शन, पारंपरिक गजीनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद भक्तांना अनुभवता येणार आहे.
ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून वर्षानुवर्षे ही परंपरा टिकून आहे आणि यंदाही भक्तिभावाने आबाबा देवाची यात्रा साजरी होणार आहे.
Comments
Post a Comment